आता आवाजावरुन होणार कोरोनाची चाचणी;व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा प्रारंभ

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुंबईतील गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे.मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला. पायलट तत्वावरील या उपक्रमाचा महापालिका अधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रूग्णांकरीता त्वरित निदान आणि रिकवरी वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री  आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. पण निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील, असेही पालकमंत्री ठाकरे यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात विविध अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Previous articleराज्यातील ई-पासचे निर्बंध हटविणार ? लवकरच घेणार निर्णय
Next articleअनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी ५६९ तरुणांना आयटीआयमधून प्रशिक्षण