मोठी बातमी : राज्यात लवकरच रात्रीचा लॉकडाऊन लावणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । ओमयक्रॅानचे या कोरोनाच्या नव्या विषाणुने जगभर नवे संकट निर्माण केले आहे. आपल्याकडे ओमायक्रॅानचे रुग्ण सर्वत्र सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात आमदारच जर मुखपट्टी लावत नसतील तर त्यांना सदनाच्या बाहेर काढा,अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षांना केली.तसेच रात्रीचा लॅाकडाऊन लावण्यावर गांभिर्याने विचार चालु आहे,असेही ते म्हणाले.

सकाळी प्रश्नोत्तर झाल्यानंतर अजित पवार उठले आणि त्यांनी मुखपट्टी न लावण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. पवार म्हणाले, ओमायक्रॅान संसर्ग सर्वत्र वाढत आहे. युरोपात किमान ५ लाख नागरिक ओमायक्रॅानच्या लाटेत मृत्युमुखी पडतील, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. पंतप्रधान नव्या विषाणुने मोठ्या चिंतेत आहेत. ओमायक्रॅानपेक्षा अधिक घातक असा नवा कोरोना विषाणु आला आहे, असे नुकतेच माझ्या माहितीत आले. आपल्याकडे ओमायक्रॅानचे रुग्ण सर्वत्र आढळू लागले आहेत.अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी असणारे आमदार मुखपट्टी लावत नसतील तर नागरिकांना काय सांगायचे. जे आमदार सदनात मुखपट्टी लावत नाहीत, त्यांना अध्यक्षांनी बाहेर काढले पाहिजे. याची नोंद अध्यक्षांनी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सदनाला तशी सूचना केली. फारच त्रास होत असेल तर बोलताना मुखपट्टी काढली तर चालेल मात्र मुखपट्टी प्रत्येक सदस्याने लावली पाहिजे, अशी तंबी जाधव यांनी दिली. त्यानंतर लागलीच अनेक आमदारांनी खिशात ठेवलेली, गळ्याला लावलेली मुखपट्टी पटापट तोंडावर चढवली.

Previous articleछगन भुजबळांचा घणाघात : केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा न दिल्याने ओबीसींचे आरक्षण अडचणीत
Next articleमंत्री आदित्य ठाकरेंना ठार मारण्याची धमकी ; एसआयटी मार्फत चौकशी