नारायण राणेंना खिंडीत गाठण्याचा शिवसेनेचा प्रयत्न ;खासदार राऊतांचे गंभीर आरोप

मुंबई नगरी टीम

कणकवली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे आता राजकारणाच्या अवतीभवती अधिक फिरताना दिसत आहे. त्यातही राज्यातील विरोधी पक्ष भाजपने हा मुद्दा उचलून धरला आहे. भाजपचे खासदार नारायण राणे हे या प्रकरणी अधिक तत्परता दाखवत आहेत. मात्र नारायण राणे स्वतःचा चुलत भाऊ अंकूश राणे प्रकरणी गप्प का ?, असा थेट सवाल  शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विचारला आहे. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

खासदार नारायण राणे हे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. परंतु भावाच्या हत्या प्रकरणी राणे चकार शब्दही काढत नसल्याने विनायक राऊत यांनी नव्याने हा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे. “सिंधुदूर्ग जिल्ह्यात २००२ ते २०१३ या कालावधीत अनेक राजकीय अथवा वैयक्तिक स्वार्थ बुद्धीने केलेल्या मनुष्यवधाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नारायण राणे यांचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या हत्येचे प्रकरण देखील आहे. परंतु सुशांतच्या बाबतीत तत्परता दाखवणारे राणे स्वतः च्या चुलत भावाच्या मृत्यु बाबत बोलले नाहीत. त्यावेळी राणे स्वतः मंत्री असतानाही अशी तत्परता त्यांनी अजिबात दाखवली नाही. अंकुश यांचे मारेकरी कोण? त्यांचा खुण कोणी? केला याबाबत राणे गप्प का?” असा सवाल खा.  राऊत यांनी केला आहे.

जिल्ह्यात घडलेले असे अनेक खुन, मृत्यूची पुन्हा उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करत असल्याचे विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार  जिल्ह्यातील सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मंचेकर यांच्या मृत्यू, खुणा प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.  दरम्यान, विनायक राऊत यांनी केलेल्या या मागणीमुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Previous articleदणका : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीच्या चौकशीचे आदेश
Next articleखूशखबर : येत्या दोन दिवसांत जिम सुरू होणार