मुंबई नगरी टीम
सातारा : राज्यातील ठाकरे सरकार मधील सहकारमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांचे चिरंजीव जशराज (बाबा) पाटील यांनी दिली.संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी,शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यातील ठाकरे सरकार मधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर राज्याचे सहकार मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली.त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती जशराज (बाबा) पाटील यांनी दिली.तर संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावे असे आवाहन सहकार मंत्री पाटील यांनी केले आहे.