मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावर आता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर, खासदार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी कधीही डॉक्टरांकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो. डॉक्टरांना काय कळते, असे विधान केले होते. यावर राज्यातील डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान संजय राऊत यांनी आपण डॉक्टरांचा अपमान केलेला नाही. आपण नेहमी डॉक्टरांच्या पाठीशी उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु राऊतांच्या स्पष्टीकरणा नंतरही हे प्रकरण शमले नसून इंडियन मेडिकल असोसिएशनकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन लिहीलेल्या पत्रात म्हटले की, “सध्या संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे, याची तुम्हाला जाणीव आहे. आरोग्य कर्मचारी केवळ आपलाच नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असणा-या जोडीदार, मुलं, वयोवृद्ध आई-वडील यांचाही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी फ्रन्ट लाईन वर्कर्स सोबत उभे राहावे अशी अपेक्षा आहे. संजय राऊत यांनी कंपाऊंडरला डॉक्टरांपेक्षा जास्त कळते असे म्हटल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. आम्ही त्यांच्या वागण्याचा निषेध करतो व राजीनाम्याची मागणी करतो. अशा अपमानजनक आणि नकारात्मक प्रतिक्रियांमुळे आम्ही पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. डॉक्टरांचे खच्चीकरण झाले असून तुम्ही योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.”