मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्व सामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय, असे ट्वीट त्यांनी केले आहे.तर अमरावतीच्या खासदार यांचा कोरोनाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.
“मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात डॉक्टर राहूल आणि त्यांच्या टीमच्या मदतीने झालेल्या १० दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली असून मी आणि माझी घरी आलो आहोत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्व सामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय”, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान १० ऑगस्ट रोजी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. स्वतः किरीट सोमय्या यांनीच ट्वीट करून ही माहिती दिली होती. त्यानंतर फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तर, आता उपचारानंतर त्यांनी पुर्णपणे कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, उपचार घेऊन घरी परतलेल्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोनाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर रविवारी १६ ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर त्यांना २० दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यांची पुन्हा चाचणी केल्यानंतर नवनीत राणा यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.