मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक उद्या गुरूवारपासून सुरू करण्यात येणार आहे.राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने टाळेबंदीतून अनेक शिथिलता दिल्या आहेत.तर ग्रामीण भागातील नागरिकांनचे प्रवासाचे प्रमुख साधन असलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत असतानाच गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय आज घेतला आहे.राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.याकरिता ई पासची आवश्यकता नसली तरी एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यातील खासगी वाहनाच्या प्रवासासाठी ई पास लागू राहणार आहे.
राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे २३ मार्चपासून एसटीची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र २२ मे पासून रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला.परंतु ग्रामिण भागात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली होती.राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने सर्वसामान्यांची लालपरी डेपोमध्येच उभी होती.कोरोनाच्या संकटामुळे महामंडळावर आर्थिक संकट येवून गेल्या तीन महिन्यात महामंडळाचा सुमारे २३०० कोटींचा महसूल बुडाला आहे.