सत्यमेव जयते! सुशांत प्रकरणाच्या निकालानंतर पार्थ पवारांचे ट्वीट

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी पुन्हा ट्वीट करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. “सत्यमेव जयते!” असे ट्वीट पार्थ पवार यांने केले आहे. याआधी देखील पार्थ यांच्या सुशांतसिंह प्रकरणातील भूमिकेमुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या.

सुशांत प्रकरणाचा निकाल आज सकाळी सर्वाेच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, असे अनेकांचे मत होते. यामध्ये पार्थ पवार यांनी देखील सीबाआय चाैकशीच्या मागणीचे पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता पार्थ पवारच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

दरम्यान, शरद पवारांच्या या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर हा वाद पवार कुटुंबीयांच्या अवतीभवती फिरत होता. मात्र अजित पवार नाराज नसून पवार कुटुंबीयांत एकोपा असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता पुन्हा पार्थ पवार यांच्या ट्वीटमुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली अशोक चव्हाणांच्या जबाबदारीत वाढ
Next articleआता एसटीने एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करता येणार