मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या काळात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जात आहे.यंदाच्या जेईई आणि नीट परीक्षा या पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार होणार, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केली आहे.यावर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोना काळात जेईई आणि नीटच्या परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा,अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.यासंदर्भातील ट्वीट त्यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या अशा अनिश्चित परिस्थितीत जेईई आणि नीट परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. या प्रवेश परीक्षा आता घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी माझी केंद्र सरकारला विंनती आहे, असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या निर्णयावर काही भूमिका मांडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जेईई आणि नीट परीक्षा याआधी जूलै महिन्यात होणार होत्या. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतू एनटीएने प्रसिद्धी केलेल्या पत्रकानुसार यापूर्वी जाहीर केलेल्या तारखांप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होईल. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.