‘दार उघड उद्धवा दार उघड’, भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : देशभरातील मंदिरे खुली केली जात असताना महाराष्ट्रात याबाबतचा निर्णय काही होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साई बाबा मंदिर खुले करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये आता भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीने पुढाकर घेत मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे.या करता येत्या २९ ऑगस्टला घंटानाद आंदोलन देखील केले जाणार असल्याची माहिती भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे. ट्विटरवर यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.

देशभरातील मोठमोठी देवस्थाने सुरू झाली. आणि महाराष्ट्रात मॅाल्स सुरू झाले. मांस व मद्य विक्री सुरू झाली. पण मंदिरे बंद आहेत. महाराष्ट्रातील विविध व्यक्तींनी संस्थांनी सरकारकडे पत्र पाठवून मागणी केली. पण हे सरकार ती मागणी मान्य करत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या धार्मिक संघटना, प्रमुख देवस्थाने आणि विविध सांप्रदायाचे धर्माचार्य आम्ही सर्व एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षा गाढ झोपलेल्या या ठाकरे सरकारला इशारा देण्याकरता एकादशीच्या दिवशी ‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी आर्त हाक देत घंटानाद आंदोलन करणार आहोत,अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे. तसेच राज्यातील भाविकांना व सर्व राजकीय पक्षांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील देवस्थाने खुली करण्याची मागणी अनेक स्तरांतून केली जात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शिर्डीतील साई मंदिर बंद आहे.त्यामुळे शिर्डीतील अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच छोट्या व्यापारांना देखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याच कारणास्तव भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती.त्यामुळे शनिवारी २९ तारखेला होणा-या आदोंलनात सरकारला मंदिरे खुली करण्यासाठीचे निवेदन दिले जाणार आहे.

Previous articleJEE आणि NEET परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करा,धनंजय मुंडेंची मागणी
Next articleसरकारच्या कामकाजावर पंकजा मुंडेंनी व्यक्त केली नाराजी