मुंबई नगरी टीम
मुंबई : देशासह अर्थव्यवस्थेवर आलेले कोरोनाचे संकट हे ‘ऍक्ट ऑफ गॉड ‘ म्हणजेच देवाची करणी असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केले होते. या वक्तव्यावरुन सितारामन यांना सोशल मिडीयावर देखील ट्रोल केले जात आहे. तर हा ‘ऍक्ट ऑफ गॉड ‘ नसून ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’ आहे, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकार आणि निर्मला सितारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.
“निर्मला सितारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळून देशाची अर्थव्यवस्था धुळीस मिळवली आहे. प्रश्न विचारला तर म्हणतात, ‘ऍक्ट ऑफ गॉड ‘ आहे. खरे तर हा, ऍक्ट ऑफ गॉड नाही तर, ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’ सुरू आहे. जनतेला मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे”, अशी टीका नितीन राऊत यांनी केली. सध्या कोरोनाचे सावट हे संपूर्ण विश्वावर आहे. त्यातही आधीच डबघाईला आलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीचे खापर आता कोरोनावर फोडून ती देवाची करणी असल्याचे विधान खुद्द अर्थमंत्र्यांनी केले. त्यानंतर निर्मला सितारामन यांना अनेकांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे केंद्राने आपल्याला वस्तू व सेवा कराची (जीएसटी) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राज्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जीएसटी परिषद पार पडली. यावेळी सितारामन यांनी देशावर आलेले कोरोनाचे संकट हे देवाची करणी असल्याचे म्हणत अर्थव्यवस्थेवर त्याचा परीणाम झाल्याचे सांगितले. केंद्र सरकार राज्यांना जीएसटीची थेट नुकसान भरपाई देण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीसह राज्यांना आता आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागणार आहे.