मुंबई नगरी टीम
मुंबई : सुशांतसिंग प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह व भारतीय जनता पक्ष यांच्यातील घनिष्ट संबंध आता उघड होत आहेत. या संदिपसिंहने भाजपा कार्यालयाशी तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजपा कार्यालयातील तो बॉस कोण आणि भाजपाची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणी ड्रग कनेक्शनसंदर्भात संदीपसिंह चौकशीच्या रडारवर असताना तो लंडनला पळून जाऊ शकतो असे मीडिया रिपोर्ट येत आहेत. ड्रग डिलींगशी संदीपसिंहचे नाव जोडले गेल्याने भाजपाशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध पाहता ड्रग माफियांशी भारतीय जनता पक्षाचा काही संबंध आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. यात सत्य समोर आल्यास भाजपाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. संदीपसिंहने १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात महाराष्ट्र भाजपाच्या कार्यालयात ५३ वेळा फोन केले. तो भाजपा कार्यालयात कोणाशी बोलत होता ? भाजपामधील संदिपसिंहचा हँडलर कोण आहे ? असे गंभीर सवाल सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
भाजपा व संदीपसिंह यांच्यात एवढे घनिष्ट संबंध होते की मोदींचा बायोपीक बनवण्याची जबाबदारी त्याला भाजपाने दिली. त्याच्या बदल्यात गुजरात सरकारने त्याच्या लेजंड ग्लोबल स्टूडियो या कंपनीशी १७७ कोटींचा सामंजस्य करार केला. या करारासाठी फक्त संदीपसिंह याचीच कंपनी कशी काय होती? इतर फिल्म कंपन्या व्हायब्रंट गुजरातमध्ये का सामील केल्या नाहीत ? २०१८ मध्ये भारतीय दूतावासाने प्रायोजित केलेल्या मॉरिशस भेटीदरम्यान अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात संदिप सिंह आरोपी आहे. अशा वादग्रस्त व्यक्तीला मोदींचा बायोपीक बनवण्यासाठी भाजपाने निवड करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठिंबा कसा काय दिला? ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप आहे, अशा संदीपसिंहची गृह विभागाने कसलीही शहानिशा न करता पंतप्रधानांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी निवड केली, हे आश्चर्यकारक आहे. तसेच त्याच्या या पार्श्वभूमीची तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना माहिती कशी नव्हती? ते पीएम मोदी या बायोपीकच्या पोस्टर अनावरणास कसे गेले? या प्रश्नांची उत्तरे भाजपाला द्यावी लागतील.
सुशांतसिंग प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीचे जे व्हॉटसएप मेसेज उघड झाले आहेत ते भाजपा सरकारच्या काळातील आहेत. त्यांचा ड्रग कार्टेलशी संबंध असेल तर मग त्यावेळी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री भाजपाचेच होते, त्यावेळीच असे ड्रग व्हॉट्सअॅप च्या चॅटमधून सर्रास मिळू शकत होते, असे म्हणावे लागेल. मग बॉलिवूड आणि ड्रगमाफियांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या भाजपा सरकारचा या प्रकारांना आशिर्वाद होता का? हे ही स्पष्ट झाले पाहिजे. सीबीआय चौकशीच्या घाईमागे बरेच गूढ दडले आहे, असे सावंत म्हणाले.