उद्धव ठाकरेंचे सरकार म्हणजे देवावर विश्वास नसलेली भूतं

मुंबई नगरी टीम

सांगली : राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपकडून ‘दार उघड उद्धवा’, असे म्हणत घंटनाद आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली. महाविकास आघाडी सरकार म्हणजे देवावर विश्वास नसलेली भूतं अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे.मिरज येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मंदिरे उघडण्याबाबत सरकार अद्याप निर्णय घेत नसल्याने भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही. त्यामुळे तुमची पण देवावर श्रद्धा नाही, असे म्हणावे लागत आहे”, अशी टीका चंद्रकांत पाटल यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी, काँग्रेसवर केली आहे. सहा महिने होऊनही राज्यातील मंदिरे बंद आहेत. देशभरातील अनेक मंदिरे खुली झालेली असताना महाराष्ट्रात मात्र याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही आहे. त्यामुळे राज्यात भाजपच्यावतीने आज घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते.

राज्यात मॉल, हॉटेल सुरू झाली तरी मंदिरे अद्यापही बंद आहेत. मंदिरे लवकरात लवकर खुली करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील विविध भागात आज घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. सांगलीच्या मिरजेतही आंदोलन करण्यात आले असून त्याचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावेळी घंटानाद करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

Previous articleसंदीपसिंहचा भाजपातील “तो बॉस” कोण ? भाजपा-ड्रग माफीया संबंधाची चौकशी करा !
Next article‘मदिरा चालू मंदिर बंद,उद्धवा तुझा कारभारच धुंद’ !