जेईई,नीट परीक्षा हवी की जीव वाचवायचा ? आव्हाडांनी घेतला ऑनलाईन पोल

मुंबई नगरी टीम  

मुंबई : काही दिवसांवरच आलेल्या जेईई आणि नीट परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन देखील करण्यात आले होते. परीक्षा रद्द करण्याच्या या मागणी वरूनच आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ऑनलाईन पोल घेतला आहे. यामध्ये जेईई, नीट परीक्षा हवी की, जीव वाचवायचा आहे, असे विचारत लोकांचे मत त्यांनी मागितले आहे.यावेळी अनेकांनी आव्हाडांना यात दखल देण्याची मागणी केली. तर काही नेट-यांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये JEE, NEET exam or Saving a Life असे दोन पर्याय दिले आहेत. या दोन पर्यायांपैकी तुम्ही कशाची निवड कराल? असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला आहे. यांमध्ये जेईई आणि नीट परीक्षा घेण्याकरता १४.६ टक्के लोकांनी सकारात्मकता दाखवली आहे. तर, ८५.४ टक्के लोकांनी दुसरा पर्याय म्हणजे अर्थातच Saving a Life हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सध्या परीक्षा न घेण्यावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. त्यासोबतच काही नेटक-यांनी जितेंद्र आव्हाड यांना ट्रोल देखील केले आहे. तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे तुमच्या अधिकारांचा वापर करत परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. पोल घेण्यापेक्षा तुम्ही याविरोधात तुमचा आवाज उठवा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या, अशी प्रतिक्रिया नेटक-यांनी दिली आहे. तर काहींनी या मुद्दयावरून राजकारण करू नका, अशी टीका देखील आव्हाडांवर केली आहे.

यंदाच्या जेईई आणि नीट परीक्षा या पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार होणार, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केली आहे. त्यामुळे १ ते ६ सप्टेंबरला जेईई व १३ तारखेला नीटची परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे कीतपत योग्य आहे, असा सवाल अनेकांडून केला जात आहे. यासाठी काँग्रेसने शुक्रवारी देशभरात आंदोलन देखील केले होते.

Previous article‘उद्धवा अजब तुझे सरकार’ महाविकास आघाडीतील घटक पक्षाची सरकारवर टीका
Next articleसंदीपसिंहचा भाजपातील “तो बॉस” कोण ? भाजपा-ड्रग माफीया संबंधाची चौकशी करा !