अमृता फडणवीसांची पुन्हा राजकीय वादात उडी,खडसेंना दिले प्रत्युत्तर

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे.पक्षांतर्गत हा वाद सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत पुन्हा राजकीय वादात उडी घेतली आहे.तर यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का ?, असा हल्लाबोल खडसेंनी केला होता.त्याला अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या,” तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी,तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो!”,असे प्रत्युत्तर आणि अप्रत्यक्ष टोला त्यांनी खडसेंना लगावला आहे. एकनाथ खडसे यांचा राजीनामा माझ्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे घेण्यात आला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी आपल्या या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते.

एमआयडीसीच्या जमिनीशी माझा संबंध नाही. ही कथित जमीन माझी बायको आणि जावयाने घेतली. याबाबत माझा व्यवहार झालेला नाही. मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध ?, मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का ?,असा सवाल यावेळी एकनाथ खडसेंनी केला होता. समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला. तर तो देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा केलेला गैरवापर होतो का?,असे खडसे म्हणाले होते. मात्र खडसेंनी दिलेले हे उदाहरण अमृता फडणवीस यांना काहीसे पटलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांनी ट्वीट करत आपण अशी चूक करणार नाही, असा टोला लगावला आहे.

Previous articleविधानपरिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती का झाली नाही; राज्यपालांनी केला मोठा खुलासा
Next articleछगन भुजबळांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव ; ६ कर्मचारी पॉझिटिव्ह