छगन भुजबळांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव ; ६ कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई नगरी टीम

मुंबई : दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या मंत्रालयातील  तीन कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या  कार्यालयातील अधिका-यांसह सहा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील भुजबळ यांचे कार्यालय आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती.ठाकरे सरकारमधील अर्धा डझनच्यावर मंत्र्यांनाही कोरोनाने सोडले नाही.गेल्याच गुरूवारी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयातील तीन कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने हे कार्यालय एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते.तर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज करण्यात आले आहे.ही घटना ताजी असतानाच आता मंत्रालयातील दुस-या मजल्यावरील अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या  कार्यालयातील एकूण सहा जणांना कोरोनाची  लागण झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी रेशनिंग संदर्भात झालेल्या बैठकीनंतर राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करण्याच निर्णय घेतला.या बैठकीला उपस्थित काही कर्माचा-यांच्या संपर्कात आल्याने या अधिका-यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनतर काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली.यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने कार्यालाय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

Previous articleअमृता फडणवीसांची पुन्हा राजकीय वादात उडी,खडसेंना दिले प्रत्युत्तर
Next articleमराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नका