मुंबई नगरी टीम
मुंबई : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.कोरोनावर लस येत नाही तोवर निष्काळजीपणा करू नये,असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कोरोनामुळे यंदाच्या अधिवेशनात अनेक बदल करण्यात आले असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी शनिवार आणि रविवारची सुट्टी देखील रद्द करण्यात आली असल्याची माहिती मोदींनी दिली.
संसदेच्या अधिवेशनाबाबत सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “कोरोना आहे,कर्तव्यही आहे.सर्व खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. मी सर्व खासदारांचे अभिनंदन करतो. अर्थसंकल्पाचे सत्र वेळेआधीच थांबवावे लागले होते. यंदाच्या अधिवेशनात अनेक बदल करण्यात आले आहेत. शनिवार, रविवारची सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. मात्र याचे सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे”, असे मोदी म्हणाले. अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय होतील, अनेक विषयांवर चर्चा होईल.लोकसभेत जितक्या महत्त्वाच्या चर्चा होतील, तितकाच त्याचा देशाला फायदा होईल, असेही मोदी म्हणाले.
जगात कुठेही कोरोनावर लवकरात लवकर लस यावी.शास्त्रज्ञ देखील प्रयत्न करत आहेत. या संकटातून प्रत्येकाला बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळेल,असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. शिवाय त्यांनी सीमेवर तैनात भारतीय जवानांविषयी देखील भाष्य केले. “आपले जवान मोठ्या हिमतीने देशाच्या सीमेवर तैनात आहेत. दुर्गम भागात, पर्वतांवर मोठ्या हिमतीने त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. जवान ज्या विश्वासाने मायभूमीच्या रक्षणासाठी तत्पर आहेत. हे सदन आणि सदस्य देखील एका भावनेने हा संदेश देतील की संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी आहे”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.