जितेंद्र आव्हाडांचा धडाकेबाज निर्णय; पोलिसांना मिळणार ५६७ घरे  

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुन:र्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे ५६७ घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आव्हाड यांनी तत्काळ मार्गी लावल्याने सबंध पोलीस दलातून समाधान व्यक्त केले जात आहे.

१९७३ मध्ये म्हाडाने ठाणे पोलिस आयुक्तालयाला ८५६ सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. परंतु त्यानंतर गेल्या ४६ वर्षांमध्ये योग्य प्रकारे इमारतींची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित इमारतींमध्ये आजी-माजी पोलिसांची कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत. काही पोलिस कुटुंबांना रेंटल हाऊसिंग योजनेत स्थलांतरित करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात चार एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यापुढे कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या समोर हा प्रश्न आल्यानंतर त्यांनी मंगळवारी गृहनिर्माण खात्याच्या वतीने तत्काळ एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, गृहनिर्माणचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

यावेळी आव्हाड यांनी वर्तक नगरच्या पोलीस वसाहतीचे तत्काळ पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. म्हाडाने पोलिस वसाहतीचा पुनर्विकास करीत त्यावर पोलिसांना ५६७ घरे मोफत बांधून द्यावीत आणि उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाने वितरीत करावीत, असे आदेशही  आव्हाड यांनी दिले.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणा-या पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्याचा चंग आव्हाड यांनी बांधला होता. त्यांचे हे प्रयत्न आता प्रत्यक्षात साकारले जाणार आहेत. या वसाहतीमध्ये निवृत्त पोलिसांनाही घरे मिळणार असल्याने पोलीस दलातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous articleमंत्री उदय सामंत यांना ‘अभाविपची’ धमकी
Next articleअंकुश यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही