मुंबई नगरी टीम
मुंबई : महापालिकेच्या सायन रूग्णालयातील गलथान कारभाराविरुद्ध राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक झाले आहेत.रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा समाचार घेत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार,पदाधिकारी व शेकडो जनतेसोबत सायन रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. विरोधी पक्षाची आक्रमकता बघत मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी या विषयावर बुधवारी बैठक घेण्याचं आश्वासन दिले.त्यांच्या आश्वासनानंतर तूर्तास या आंदोलनाला स्थिगिती देण्यात आली आहे.
अपघातात जखमी होऊन शनिवारी रात्री मृत झालेल्या अंकुश सुरवडे या २८ वर्षीय तरूणाचा मृतदेह रुग्णालयाने भलत्याच लोकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली. तसेच अंकुशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.यामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हंगामा केला. सायन रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला.त्यामुळे रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराविरुध्द विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार कॅप्टन तामिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, भाजप जिल्हाधक्ष्य राजेश शिरवाडकर आदी उपस्थित होते.
दरेकर यांनी यावेळी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरेकर यांनी यावेळी सांगितलं कि राज्य सरकार अवहेलना करण्यात आनंद मानत आहेत. हे सरकार पूर्णपणे अहंकाराने भरलेलं आहे. विरोधी पक्षनेते, आमदार, शेकडो जनता रस्त्यावर दोन ते तीन तास न्याय मागायला बसली आहे, तरी प्रशासनाला दखल घ्यायची गरज भासली नाही. यांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आल्यावर मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त जागे झाले आहेत. उद्या बुधवारी पाच वाजता या विषयवार त्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही तात्पुरतं आमचं आंदोलन स्थगित केलं आहे. उद्या जर या विषयावर योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होणार. अश्या शब्दात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
याच बरोबर अंकुश यांच्या कुटूंबियांची मागणी मान्य करत त्यांना जो संशय आहे त्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी लावावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर बोलताना ते म्हणाले केवळ कर्मचाऱ्यांना निलंबित करून उपयोग नाही तर यंत्रणेचे जे प्रमुख आहेत त्यांना या विषयात जबाबदार धरून त्यांचं निलंबन करावं.अंकुश यांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत द्यावी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे. आमची सरकार कडून मागणी आहे कि त्यांनी अश्या असह्य लोकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील प्रमुख विषयांवर वारंवार सरकारकडे पत्र पाठूवुन सुद्धा सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार कडून मागणी पूर्ण होत नसतील तर मागणी करून फायदा काय. मी १०० पत्र पाठवले पण एकही पत्रच उत्तर राज्य सरकार कडून आलं नाही तरी अंकुशच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो असेही दरेकर यांनी नमूद केले .