मुंबई नगरी टीम
मुंबई : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेकांचे इनकमिंग सुरू झाले आहे.आज बुधवारी परभणीचे माजी आमदार सिताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधत पक्षात प्रवेश केला.मुंबईत राष्ट्रवादी भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रेवश पार पडला. यावेळी सीताराम घनदाट यांचे स्वागत करत जयंत पाटलांनी हळूहळू दर आठवड्याला पक्षात नवीन लोक येतील,असा दावा केला आहे.त्यांच्या या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
सिताराम घनदाट यांनी पक्षात प्रवेश केल्याने आता परभणीत आमची ताकद वाढेल,असेही जयंत पाटील म्हणाले. तर गेले काही महिने ते संपर्कात होते, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.सिताराम घनदाट हे अपक्ष आमदार होते.परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या विधानसभा मतदारसांघातील ते आमदार होते. शिवाय ते अभ्युदय बँकेचे अध्यक्ष देखील आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यासह ३० आमदार लवकरच महाविकास आघाडीतील पक्षांत प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नवे पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.