मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविषयी भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ओबीसी समाजाला साद घातली आहे.वेळ पडली तर ओबीसी समाजाने मन मोठं करून मराठा समाजातील वंचितांना सामावून घ्यावे,असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर चांगलेच आहे,असेही त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षण मिळायला हवे ही राज्य सरकारची भूमिका आहे.मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे.केंद्र सरकर यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. महाराष्ट्राचे खासदार संसदेत हा मुद्दा मांडत आहेत. कोणत्याही मार्गाने का होईना पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,असे अमोल कोल्हे म्हणाले.मराठा समाजाची मागणी ही रास्त आहे. ओबोसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर चांगलेच आहे. जर आपण २०११ ची जनगणना लक्षात घेतली तर ५२ टक्के ओबीसी समाज असताना आरक्षण केवळ २७ टक्के आहे.लोकसंख्येच्या तुलनेत हे आरक्षण कमी आहे. पण जर तशी वेळच आली तर ओबीसी समाज सुद्धा कदाचित आपले काळीज मोठे करू शकतो. व जे मराठा समाजातील वंचित आहेत त्यांना आरक्षण दिले जाऊ शकते,असे अमोल कोल्हे म्हणाले.
सध्या केंद्राची एकूण पॉलिसी पाहिली तर अनेक गोष्टी खासगीकरणाकडे जात आहेत. अशावेळी आरक्षण महत्त्वाचे आहे तितकेच तरुण पिढीने आपली गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला पाहिजे, असे महत्त्वाचे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तर सरकारची भूमिका ही आरक्षणविरोधी आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे आरक्षण टिकवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी सरकार समोर आहे.