आमच्या हातात दगड अन् तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत : राजू शेट्टींचा केंद्राला इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने राज्यसभेत मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकावरून विरोधकांमध्ये नाराजी आणि संतापाची भावना आहे. या विधेयकावरूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर भलेही लोकसभा आणि राज्यसभेत कायदे पारित केले. पण त्याची अंमलबजावणी कशी करता हे पाहायचे आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोप नसून आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा, असा सुचक इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले, “पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये शेतक-यांच्या विरोधातील कायदे पास करून घेतले. पण त्याची अंमलबजावणी कशी करणार ते आम्हाला बघायचंच आहे. भलेही तुम्ही कटकारस्थान करून अनेक राजकीय पक्षांच्या सहकार्याने शेतक-यांना काॅर्पोरेट सेक्टरच्या घशात घातलं. त्याला शेतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण याद राखा शेतक-याचा हमीभाव हा जन्मसिद्ध हक्क आहे. तो जर का तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न केला तर, एक दिवस या देशातील करोडो शेतक-यांची मुलं ही हातात दगड घेतील. या दगडामध्ये तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा”, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

 आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य तसेच हमी भाव आणि कृषीसेवा विधेयक पारित झाली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकांना विरोध दर्शवला. उपसभपतींसमोर असलेली नियमपुस्तिका देखील यावेळी फाडण्यात आली. विरोधकांच्या या सर्व वर्तनाची दखल घेत विरोधी पक्षातील आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर कारवाई करण्यात आलेल्या संबंधित खासदारांनी आज आंदोलन करत आपला विरोध कायम ठेवला आहे.

Previous articleओबीसी समाजाने काळीज मोठे केले तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं
Next articleओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका :प्रकाश आंबेडकर