ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका :प्रकाश आंबेडकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा नेत्यांनी गोंधळ न घालता थोडा संयम बाळगावा. आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करू नका. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा नेत्यांना दिला आहे. देशभरातील ओबीसी समाज जर एकत्र आला तर जे आरक्षण मराठा समाजाला महाराष्ट्रापुरता मिळणार आहे ते ही मिळणार नाही, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात जोर धरत आहे. असे असतानाच ओबीसी समाजाने मन मोठं करून मराठा समाजातील वंचितांना आपल्यात समाविष्ट करून घ्यावे, असे काही मराठा नेत्यांचे म्हणणे आहे. यावर माध्यमांसमोर आपले मत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी जे काही सोशल मीडियावर वाचतोय त्याचा अर्थ हाच निघतोय की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. पण आमच्या ताटात वाटणी नको, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. माझे सर्व मराठा नेत्यांना हे आवाहन आहे की, हा विषय अधिक गुंतागुंतीचा करू नये. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये.

मराठा हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्रात मराठा समाज १६ टक्के असला तरी देशात तो २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी समाज जर एकत्र आला तर जे आरक्षण मराठा समाजाला महाराष्ट्रापुरता मिळणार आहे तेही मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने एक स्थगितीचा आदेश दिला यावर घाबरून जाऊ नये. मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला आल्यास मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय कायम ठेवेल. निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल. त्यामुळे अधिक गुंतागुंत करू नये”, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Previous articleआमच्या हातात दगड अन् तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत : राजू शेट्टींचा केंद्राला इशारा
Next articleमृतांच्या कुटुंबियांना ५ लाख,१० लाख रुपये देऊन गेलेले जीव परत येणार नाही