भाजप आणि शिंदे गटाशी युती करणार की नाही ? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) आणि वंचित बहजुन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहजुन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेवून बंद दाराआड चर्चा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.मात्र प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिंदे गटाशी युती करण्याचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) आणि वंचित बहजुन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू असतानाच राजगृह निवासस्थानाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी वंचित बहजुन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.मात्र या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिंदे गटाशी युती करण्याचा दावा फेटाळून लावला.या भेटीत इंदू मिलच्या जागी उभ्या राहणाऱ्या स्मारकाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करीत जे कोणी भाजपाबरोबर जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका असून,शिंदे गटाशी युती करणार असल्याचा दावा फेटाळून लावला.

शिवसेनेच्या संभाव्य युती बद्दलही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले.महाविकास आघाडीमधील काही घटक पक्षांशी चर्चा झाली आहे.त्या चर्चेत महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का ? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती असेही आंबेडकर म्हणाले.पण महाविकास आघाडीचे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचे पुढे काय होईल असे दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.युतीबाबत काँग्रेसचे काही नेते भेटून गेले होते,त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली.मात्र शिवसेने सोबत राजकीय चर्चा झालेली नाही.शिवसेनेच्या काही नेत्यांनी भेट घेतली मात्र ही भेट एका कार्यक्रमासंदर्भात होती असेही त्यांनी सांगितले.

भेटीत कोणतेही राजकारण नाही

दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली राजभवन ही वास्तू पाहिली.या भेटीत कोणतेही राजकारण नाही.त्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नका ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे मोठे भूषण आहे.त्यांनी वास्तव्य केलेले राजगृह ही वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राजगृहाची निर्मिती झाली आहे.या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील वस्तू,छायाचित्रे आणि त्यांच्या अभ्यासाच्या खोलीची पाहणी केली.या खोलीतील वस्तू आजही त्याच स्थितीत आहेत. राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

Previous articleकाँग्रेसने गुजरात निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर सोपवली महत्वाची जबाबदारी
Next articleभारत जोडो यात्रा : राहुल गांधी यांनी संभळ, ढोल ताशांच्या गजरावर धरला ठेका