धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय: दिव्यांग अधिकारी,कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना काळात २१ एप्रिल व ११ जून च्या शासन निर्णयास अनुसरून आता ज्या कार्यालयांमध्ये १०० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. अशा कार्यालयात सुद्धा दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सूट देण्याचा निर्णय राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज  जारी करण्यात आला आहे.दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती ही सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमकुवत असते, त्याचबरोबर वाहतुकीच्या सोयी सुविधांचा विचार करून लॉकडाऊनच्या काळात देखील काही कार्यलयांमध्ये टप्प्याटप्प्याने उपस्थितीची प्रमाण वाढवले जात असताना दिव्यांग कर्मचाऱ्यांना मात्र २१ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता.

पुढील काळात अनलॉकच्या टप्प्यांमध्ये कर्मचारी उपस्थितीची टक्केवारी काही मर्यादेत वाढविण्यात आली तसेच काही ठिकाणी रोटेशन पद्धतीने कामकाज केले जात होते. काही कार्यलयांमध्ये आता कर्मचारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु वाहतुकीच्या सुविधा मात्र आणखी पूर्णपणे सुरळीत नाहीत; या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असलेल्या कार्यालयांमध्येही दिव्यांग व्यक्तींना उपस्थितीतून सूट मिळवून दिल्याने दिव्यांग कर्मचारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोर आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दिव्यांग अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे त्याचा परिणाम कार्यलयीन कामकाजावर होणार नाही याची काळजी त्या – त्या विभागाने घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे.

Previous articleमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले कोकण विभागाचे कौतुक
Next articleआशा स्वंयसेविका,गटप्रवर्तकांना लवकरच मोबदला मिळणार :मुख्यमंत्री ठाकरे