नाराज एकनाथ खडसेंना केंद्रीय नेतृत्वाने डावलले; लवकरच घेणार मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मंत्री आणि भाजपचे नाराज नेते भाजपची एकनाथ खडसे यांना केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा डावलले आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.मात्र खडसे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने एकनाथ खडसे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राज्यातील नाराज नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.त्यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश आहे. पंरतु भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलण्यात आले असून राष्ट्रीय कार्यकारणीत त्यांना स्थान देण्यात आले नाही.भाजपने ट्विटरवरील आपल्या अधिकृत पेजवरून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये विनोद तावडे,पंकजा मुंडे,विजया राहटकर,सुनील देवधर यांची राष्ट्रीय मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच व्ही. सतीश राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री, जमाल जिद्धीकी अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष, हिना गावित आणि संजू वर्मा यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यकारिणीत नाराज एकनाथ खडसे यांना मात्र स्थान देण्यात आलेले नाही.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य कार्यकारिणी घोषित केली होती. त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचा समावेश करण्यात आला नव्हता. तर आता भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली असून पंकजा मुंडे, विनोद तावडे आदींना यात स्थान देण्यात आले. पंरतु एकनाथ खडसे यांची मात्र वर्णी लागलेली नाही. एकनाथ खडसेंची पक्षांतर्गत असलेली खदखद ही काही नवखी नाही. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरील नाराजी देखील खडसेंनी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी न लागल्यामुळे एकनाथ खडसेंची ही नाराजी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. नाराज खडसे हे लवकरच वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्यात आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या एका बड्या  नेत्याच्या प्रवेशाबाबत बैठक घेवून खलबत केली होती.

Previous articleपंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी;राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती
Next articleसंजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक; अनेक चर्चांना उधाण