मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे.सामंत यांनी याची माहिती समाज माध्यमाद्वारे दिली आहे.गेले दहा दिवस मी स्वत: विलगिकरणात असून,पुढच्या आठवड्यात पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होणार असल्याचा निर्धार सामंत यांनी केला आहे.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच ठाकरे सरकार मधील मंत्र्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे.महाविकास आघाडी सरकार मधील तब्बल १५ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे.गेली दहा दिवस मी विलगिकरणात असून,१० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे कोणालाही संसर्ग होण्याची शक्यता नाही तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी.माझी प्रकृती ठणठणीत असून,पुढील आठवड्यात पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होणार असल्याचा निर्धार सामंत यांनी व्यक्त केला आहे.कुडाळ-मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यापुर्वी मंत्री उदय सामंत हे त्यांच्या संपर्कात आल्याने सामंत हे १५ दिवस होम क्वारंटाईन होते.गेल्याच आठवड्यात सामंत यांना विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा करून विद्यापीठांचा आढावा घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार या नात्याने त्यांनी गेल्याच आठवड्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये कोरोना परिस्थिताचा आढावा घेतला होता.
दरम्यान ठाकरे सरकार मधील सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,वस्त्रोद्योगमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख,पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय बनसोडे,उर्जामंत्री नितीन राऊत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू या मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.तर,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत.ठाकरे सरकार मधील कोरोनाची लागण झालेले सामंत हे १६ वे मंत्री आहेत.

















