मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती आहे,असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजभवनात जाऊन सांगावे लागेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याने पुन्हा राजकीय वातावरण खवळले.
यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच टोला लगावला आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही त्यांनी भाष्य केले. माध्यमांशी ते बोलत होते. मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील तर राजभवनात जाऊन सांगावे लागेल,असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, राजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर, चीन, पाकिस्तान, कोरोनाबद्दल चर्चा होते, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी यावेळी दिले.
ही भेट राजकीय नव्हती असे संजय राऊतांनी याधीही सांगितले होते. मात्र राजकीय वर्तुळातील तर्कवितर्क आणि चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचीही भर पडल्याने महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. मात्र संजय राऊत यांनी आता पुन्हा यावर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.