मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्र सरकारने सिनेमा,थियेटर,मल्टीप्लेक्स यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के आसन व्यवस्थेनुसार सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर,येत्या ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी देवून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने अनलॉक-५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.गर्दी टाळण्यासाठी मास्क,सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार सुरू करू करण्याची मागणी हॉटेल,रेस्टॉरंट मालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.यापूर्वी मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र अनलॉक-५ मध्ये हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.
अनलॉक-५ मध्ये राज्य सरकारने पुणे विभागातील ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्यातल्या राज्यात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या लोकल मध्ये सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारांना प्रवासाची परवानगी आहे.असे असताना लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.तर मुंबईतील डबेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सिनेमा,थियेटर,मल्टीप्लेक्स यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के आसन व्यवस्थेनुसार सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारने राज्यातील सिनेमा,थियेटर,मल्टीप्लेक्स सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही.याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. अनलॉक-५ अंतर्गत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्रात येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.