एकनाथ खडसेंच्या भेटीवर काय म्हणाले,शरद पवार !

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर पुन्हा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या भेटीबाबत आता स्वतः शरद पवार यांनीच खुलासा केला आहे. एकनाथ खडसे यांच्याशी आज कोणतीही भेट होणार नाही, असे शरद पवारांनी म्हटले. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केले असून भेटीचे वृत्त फेटाळले आहे.

एकनाथ खडसेंसोबत आपली भेट होणार आहे का, असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी नाही असे उत्तर दिले. एकनाथ खडसे यांच्यासोबत कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या आपण दिल्लीला जाणार असून आज अशी कोणतीही भेट होणार नसल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. त्यामुळे सकाळपासून शरद पवार आणि एकनाख खडसे यांच्या भेटीबाबत रंगलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत दाखल झाले असून शरद पवारांची भेट घेणार असल्याचे वृत्त होते.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देखील आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. नाराज एकनाख खडसे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. असे असतानाच उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी प्रवेश करणार अशा चर्चा मध्यंतरी रंगलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे हा बडा नेता म्हणजे एकनाख खडसे असल्याचे बोलले जात होते. अशातच २३ सप्टेंबरला शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचे बोलले जात होते. परंतु या वृत्ताला राष्ट्रवादीकडून दुजोरा देण्यात आला नव्हता. तर एकनाथ खडसेंनी देखील हे वृत्त फेटाळले होते.

Previous articleराज ठाकरेंकडून मूर्तिकारांना आश्वासन,पण ‘या’ धोक्याचीही दिली सूचना
Next articleलोकशाही विरोधात भारतीय जनता पक्षाचा कट;भाजप नवदहशतवाद !