मुंबई नगरी टीम
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वेच्छा निवृत्ती घेतलेले माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढणार नाहीत.गुप्तेश्वर पांडे यांनी जदयूत प्रवेश केल्याने यंदाच्या निवडणूकीत त्यांचे तिकीट पक्के असल्याचीही चर्चा होती.परंतु जदयूने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नाही.शिवाय पांडे हे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते तिथे भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. निवडणुकीतून गुप्तेश्वर पांडे यांचे तिकीट कापल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा भाजपला चिमटा काढला आहे.
देशमुख म्हणाले, “गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट देणे हा पक्षाचा प्रश्न आहे.आम्ही त्यांना असा प्रश्न विचारला होता की,भाजपचे नेते गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करतील का ?. कदाचित याच प्रश्नाच्या भीतीमुळे त्यांना तिकीट दिले नसावे”,असा टोला गृहमंत्र्यांनी लगावला आहे.काही दिवसांपूर्वीच आलेल्या एम्सच्या अहवालानंतर अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.
“गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. जे बिहारचे पोलीस प्रमुख होते, ते आता निवडणूक लढवत आहेत. देवेंद्र फडणवीस हे बिहारचे निवडणूक प्रभारी आहेत. माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडे यांच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?”, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला होता. तर महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही, असेही अनिल देशमुख म्हणाले होते.