राज ठाकरेंचा मंत्री उदय सामंतांना फोन,ग्रंथालये सुरू करण्याचे दिले आश्वासन

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात शिथिलीकरणाची प्रक्रिया पार पडत असताना ग्रंथालय देखील सूरू करण्यात यावीत, अशी मागणी विद्यार्थी आणि वाचनप्रेमींकडून केली जात आहे.या पार्श्वभूमीवर विविध ग्रंथालयांच्या विश्वस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजवर भेट घेतली.यावेळी राज ठाकरेंनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा करून संबधित विषयावर बातचित केली. त्यानुसार ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात आठवड्याभरात नोटीफिकेशन काढू,असे आश्वासन उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

या संदर्भात बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.ते म्हणाले, “ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात मी पुण्याच्या दौऱ्यावर असताना ग्रंथालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की,यासंदर्भात आम्ही मुख्य सचिवांकडे प्रस्ताव दिला आहे. ग्रंथालये दोन दिवसांत सुरू केली जाऊ शकतात. पंरतु यावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जातील. त्यामुळे ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे”. ग्रंथालये सुरू केल्यानंतर तिथल्या मार्गदर्शक सूचनांविषयी बोलताना उदय सामंत म्हणाले, ग्रंथालये चालू करताना मास्कचा वापर करणे सर्वांना बंधनकारक असणार आहे. सॅनिटायजरची व्यवस्था देखील करावी लागणार आहे. सोशल डिस्टंसिंग पाळावे लागेल. कोरोनाचे जे प्रोटोकॅल आहेत त्या सर्वांचे पालन करावे लागेल, असे उदय सामंत यांनी म्हटले. तसेच ग्रंथालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील काही नियमावली तयार करावी लागेल त्यासाठी आठवडाभराचा कालावधी घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालयांना आर्थिक मदत करण्यांसदभार्त शासनाचा काही विचार आहे का?, असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले, अनुदान वाढवावे अशी ग्रंथालय संघटनांची पूर्वीपासूनच मागणी होती.यासाठी एक कमिटी स्थापन केली होती.अधिवेशनात या कमिटीचा अहवाल देखील सादर केला जाणार होता.पंरतु कोरोनामुळे तसे होऊ शकले नाही. मात्र त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले. याशिवाय ग्रंथालयांना मंजूर झालेले थकीत ३० कोटी सुद्धा देण्यात आले आहेत.

Previous article‘या’ प्रश्नाच्या भीतीमुळेच पांडेंचे तिकीट कापले असणार ;अनिल देशमुखांचा भाजपला चिमटा
Next articleएक राजा बिनडोक, तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा