मुंबई नगरी टीम
पुणे : पुणे महानगर पालिकेच्या झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना स्वप्न पडत असतील तर यात ऊर्जा घालवू नका, आम्ही पण तुमचे बाप आहोत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे. कोथरूड येथे भाजपच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या. यावेळी ते बोलत होते.
यावर अधिक बोलताना ते म्हणाले, पुणे महानगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ जागेवर भाजपचे सदस्य निवडून आले. एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून उर्वरित चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपचे अध्यक्ष झाले झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पंरतु अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्न पडत असून त्यांनी जास्त ऊर्जा वाया घालवू नये. आम्ही देखील त्यांचे बाप आहोत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकत्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ तर २०२० च्या निवडणुकीत ३०३ खासदार आपले मिळाले. तसेच मदत करणारे सहयोगी खासदार १०३ वरून १५३ आहेत. बलाढ्य अशा या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहात, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.