मुंबई नगरी टीम
मुंबई : महिलांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत सध्या रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने जरी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली असली, तरी प्रशासनाकडून यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रेल्वे विभागाने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवले असून त्यावर उत्तर मागितले आहे. पश्चिम रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील ठाकूर यांनी या बोलताना प्रशासनाची भूमिका मांडली.राज्य सरकारने १६ ऑक्टोबरला रेल्वेला पत्र दिले होते. सरकारच्या पत्राला उत्तर देत नेमक्या किती महिला प्रवासी प्रवास करतील, त्यासाठीच नियोजन काय असेल, याबद्दल आम्ही विचारणा केली होती, असे सुनील ठाकूर यांनी सांगितले. आम्ही कालही राज्य सरकारशी बोललो. रेल्वे अधिकच्या गाड्या चालवण्यास पूर्णपणे तयार आहे. पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांची संख्या ७०० एवढी वाढवली आहे. यामध्ये २ महिला विशेष लोकलचाही समावेश आहे. मध्य रेल्वेने देखील लोकल फेऱ्यांची संख्या ७०६ पर्यंत वाढवली आहे. महिलांना प्रवासासाठी परवानगी दिल्यास गर्दी वाढेल. त्याचे नियोजन कसे करणार याबाबत सरकारला विचारणा केली आहे. त्यावर सरकारकडून उत्तर येणे बाकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यासह स्थानकांवर जास्त गर्दी होणार नाही, प्रवाशांना कोणतीही अडचण उद्भवू,नये, सामाजिक अंतर पाळताना अवघड जाऊ नये, याची खात्री करून घ्यावी लागेल. त्यामुळे सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे सुनील ठाकूर यांनी म्हटले. दरम्यान, राज्य सरकारने परिपत्रक काढत १७ ऑक्टोबरपासून मुंबई आणि एमएमआर मधील सर्व महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर पुढे प्रवास करता येणार होते. पंरतु कोणतेही नियोजन न करता तातडीने महिलांना प्रवासाची परवानगी देता येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.