एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची नवी तारीख ठरली ? राजकीय हालचालींना वेग

मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा घटस्थापनेला होणारा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त हुकल्यानंतर आता त्यांच्या पक्ष प्रवेशाची नवी तारीख समोर आली आहे.एकनाथ खडसे हे येत्या २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार,अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.मात्र आपण भाजपचा राजीनामा दिला नसून,पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय आज रात्रीपर्यंत घेणार अशल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने खडसे यांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

भाजपात नाराज असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपला सोडचिट्ठी देवून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवस सुरू आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावाही करण्यात येत होता.मात्र १७ ऑक्टोबरचा मुहूर्त हुकल्यानंतर आता येत्या २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते स्थानिक पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार,येत्या गुरूवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा असून भाजपला एकाचवेळी दोन धक्के मिळण्याचीही शक्यता आहे. यासह खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष होते. परंतु रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार असल्याचे समजते.

दरम्यान खडसे यांच्याशी संपर्क साधला असता,आपण अजून भाजपचा राजीनामा दिलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले मात्र पुढील राजकीय वाटचालीबाबत आज रात्रीपर्यंत ठोस निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून चर्चा रंगल्या आहेत. घटस्थानेच्या मुहूर्तावर ते पक्ष प्रवेश करतील, असे वृत्तही माध्यमांमध्ये झळकले होते. परंतु घटस्थापनेला काही खडसेंचा पक्ष प्रवेश झाला नसून त्यांनी माध्यमांमधील वृत्तांचे खंडन केले. तसेच योग्य वेळ येईल, वाट पाहा, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. दरम्यान, यासंदर्भात शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, एकनाथ खडसे यांना आपली नोंद घेतली जात नाही असे वाटत असेल, तर अशावेळी जिथे नोंद घेतली जाते तिथे माणूस जाण्याचा विचार करतो. त्यामुळे एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असला त्याला आम्ही काय करणार? खडसेंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असे शरद पवारांनी म्हटले.

Previous articleगर्दी वाढल्यास नियोजन कसे करणार ? महिलांच्या लोकल प्रवासावर रेल्वेचा सरकारला प्रश्न
Next articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा मिळणार ; बाळासाहेब थोरातांची माहिती