नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा मिळणार ; बाळासाहेब थोरातांची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भागांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत.उद्या बुधवारी ते उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत.त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल,अशी महत्त्वाची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.सोमवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकसानग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील दौऱ्यात सहभागी झाले होते.

अशा संकटात केंद्र सरकारनेही राज्याला मदत दिली पाहिजे,असे थोरात यांनी सांगितले. शिवाय केंद्राकडे महाराष्ट्राचे ३० हजार कोटी रुपये देणे बाकी असून ते राज्याला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.केंद्राच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा राज्य सरकारने नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे.तर शेतकऱ्यांना कर्ज काढून मदत करा,अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.यावर प्रत्युत्तर देताना शेतकऱ्यांना कर्ज काढून मदत करायची की अजून कशी ते आम्ही पाहून,असे थोरात म्हणाले.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीविषयी देखील भाष्य केले. तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकाराने राबवलेली जलयुक्त शिवारची योजना सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. तर ही चौकशी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. कॅगने या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

Previous articleएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची नवी तारीख ठरली ? राजकीय हालचालींना वेग
Next articleभाजपचे नुकसान होईल असे कोणतेही पाऊल एकनाथ खडसे उचलणार नाहीत