मी ….पुन्हा सभागृहात येणारच ! एकनाथ खडसेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई नगरी टीम

मुंबई । चुरशीच्या झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर मात करीत तिसरा उमेदवार निवडून आणल्यानंतर येत्या २० जून रोजी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे हे उमेदवार असल्याने भाजपने विशेष रणनिती आखली आहे.मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सहज विजयी होती,असे सांगतानाच ‘मी पुन्हा सभागृहात येणारच’ असा विश्वास माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने अपक्ष आमदारांच्या मदतीने महाविकास आघाडीला धक्का दिला होता.अधिकची मते नसतानाही भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले होते.या निकालामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असतानाच आता येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणा-या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने चांगलीच चुरस होण्याची शक्यता आहे.राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांच्यावर भाजपचे विशेष लक्ष्य होते.विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे लक्ष लागून राहिले आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानास परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार अडचणीत असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहे.यात कसलेही तथ्य नसून असे वृत्त म्हणजे करमणूक असून,मी पुन्हा सभागृहात येणारच,असा ठाम विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.या निवडणुकीत भाजपकडे जास्तीची मते नसल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कसलाही फटका बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मी पुन्हा सभागृहात आलो तर मला बोलण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळेच काहींना भिती वाटत असल्याचे खडसे म्हणाले.भविष्यात मंत्रीपद मिळो अथवा न मिळो मात्र मी पुन्हा आमदार होणार हे महत्वाचे आहे,असेही ते म्हणाले.राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडे अधिकची मते होती.मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याच्याकडे अधिकची मते नाहीत.त्यांनी पाचवा उमेदवार दिल्याने या उमेदवाराला आवश्यक असणारी मते त्यांच्याकडे नाहीत.राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची गणितं वेगळे आहे.त्याच्या पाचव्या उमेदवाराला मतांची आवश्यकता आहे.आमच्याकडे मतांचा कोटा असल्याने मतांची काळजी आम्हाला नाही तर भाजपला आहे असेही खडसे यांनी सांगितले.शिवसेनेकडे अधिकची मते आहेत.शिवाय अपक्ष आमदारांचाही पाठिंबा असल्याने महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous article१४ महानगरपालिका निवडणुकांची लगबग ; प्रारूप मतदार याद्या २३ जूनला प्रसिद्ध करणार
Next articleभाजपच्या प्रदेश कार्यालयावर तृतीयपंथींयांचा धडक मोर्चा …काय कारण आहे ?