१४ महानगरपालिका निवडणुकांची लगबग ; प्रारूप मतदार याद्या २३ जूनला प्रसिद्ध करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई,ठाणे,नवी मुंबई,कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर,वसई-विरार,पुणे,पिंपरी-चिंचवड,सोलापूर, कोल्हापूर,नाशिक,अकोला,अमरावती आणि नागपूर या १४ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २३ जून रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर येत्या १ जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ जून रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता.त्यानुसार १७ जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जातील.भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Previous articleदहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; निकाल ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येणार
Next articleमी ….पुन्हा सभागृहात येणारच ! एकनाथ खडसेंनी व्यक्त केला विश्वास