मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपाला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री एकनाथ खडसे उद्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.यावेळी राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.खडसे यांच्या सारखा बडा नेता पक्षात प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या पक्षप्रवेशावेळी उपस्थित राहणार आहेत.
भाजपला धक्का देत राष्ट्रवादीच प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावात वातावरण निर्मिती केल्यानंतर आता त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.आज दुपारीच एकनाथ खडसे यांचे मुंबईत आगमन झाले आहे. तर त्यांचे हजारो,कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते एकनाथ खडसे उद्या (शुक्रवारी) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.या पक्ष प्रवेशावेळी प्रकृतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नसले तरी राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार पदाधिकारी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.शरद पवार यांच्या उपस्थित आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली तर उद्या शेतक-यांच्या दृष्टीने राज्य सरकार महत्वपूर्ण घोषणा करणार असल्याने सर्व मंत्री मुंबईत आहेत.त्यामुळे खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याने हा प्रवेश सोहळा तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दुपारी २ वाजता हा प्रवेश होणार असून याची तयारी करण्यात आली आहे.यावेळी एकनाथ खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.