मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे.राज्यातील आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींचे पॅकेज आज जाहीर केले आहे.ही मदत दिवाळीच्यापूर्वी मिळणार आहे.फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर २५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.तर जिरायत व बागायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १० हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे.पुरामुळे नुकसान झालेल्या रस्ते आणि पुलांसाठी २६३५ कोटींची या पॅकेज तरतुद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागात झालेल्या पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आणि ग्रामस्थ करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी पॅकेज देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.त्यानुसार जिरायत व बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर १० हजार,फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर २५ हजार,पुरामुळे नुकसान झालेल्या रस्ते पुल दुरूस्तीसाठी २ हजार ६३५ कोटी,नगर विकासाठी ३०० कोटी,वादळामुळे वीजेचे खाबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठी महावितरण उर्जा विबागासाठी २३९ कोटी,जलसंपदा विभागासाठी १०२ कोटी,ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठासाठी १००० कोटी,कृषि शेती घरासाठी ५५०० कोटी असे एकूण १० हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी,घर पडझडीसाठी भरीव मदत देण्यात येणार आहे.
केंद्राकडून राज्याच्या वाट्याचे अजून ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे पण ते राज्याचा अजून मिळालेले नाहीत. राज्यात परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले असतानाही अद्यापपर्यंत पूर,अतिवृष्टीची पाहणी करण्याकरता केंद्राचे पथक आलेले नाही.यासंदर्भात आम्ही केंद्राला दोन ते तीन वेळा विनंती केली आहे.आज झालेल्या पॅकेज मध्ये रस्त्यांची दुरुस्ती,शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे.आज जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज मधील मदत दिवाळीपर्यंत दिली जाणार आहे.राज्याला आर्थिक अडचण असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असाही दिलासा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिला.