मुंबई नगरी टीम
नाशिक : एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. या संदर्भात आता राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्क असून लवकरच ते भाजपची साथ सोडतील,असा दावा भुजबळ यांनी केला आहे.
आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते. आपले सरकार लवकरच येणार असल्याचे चॉकलेट भाजप त्यांच्या आमदारांना दाखवत होते. मात्र एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या चर्चा आता बंद होतील. आता कुठे बॉक्स उघडलाय, असे म्हणत छगन भुजबळ यांनी भाजपमध्ये होणाऱ्या आगामी राजकीय भुकंपाचे जणू संकेतच दिले आहेत. या आधीही जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील राष्ट्रवादीत आणखी इनकमिंग होणे बाकी असून ही फक्त सुरुवात असल्याचे म्हटले होते. तर स्वतः एकनाथ खडसे यांनी भाजपचे आजी-माजी आमदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत कोणती जबाबदारी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर बोलताना, भाजपने आता खडसेंची काळजी करू नये. खडसेंना काय मिळणार हे त्यांना आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना सुनावले. दरम्यान, खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत टीका केली होती. काही लोक लिमलेटची गोळी मिळाली तरी समाधानी होतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी हे पाहावे लागले, असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.