पवार कुटूंबातील सदस्याने केले पंकजा मुंडेंचे कौतुक

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या वयातही विशेषतः कोरोना काळात राज्यभरात दौरे आणि बैठका घेतात हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उत्साहालाच सलाम करणारे ट्वीट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले होते. पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटवर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राजकारणातील हा दिलदारपणा केवळ महाराष्ट्रातच पाहायाला मिळतो,असे कौतुक यावेळी रोहित पवार यांनी केले.

“शरद पवार साहेब, हॅटस् ऑफ… कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे”,असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले होते. मंगळवारी राज्यातील उसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसदर्भात पुण्यात बैठक पार पडली. यावेळी शरद पवार, पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर पंकजा यांनी ट्वीट करत शरद पवारांच्या कामाप्रति असलेल्या उत्साहाला दाद दिली.

यावर आज ट्वीट करत रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या दिलदारपणाचे काैतुक केले आहे. “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”,असे म्हणत रोहित पवारांनी राज्यातील भाजपच्याच काही नेत्यांना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला आहे.

Previous articleभाजपच्या बैठकीला खा.रक्षा खडसे गैरहजर ; गिरीश महाजनांनी दिले हे कारण
Next articleदिवाळीआधी लोकल सर्वांसाठी सुरू होणार ? या मंत्र्याने दिले संकेत