मुंबई नगरी टीम
पुणे : स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचे वाक्य गेल्या ३० वर्षांपासून ऐकतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकार हे स्वबळावरच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.स्वबळ होते म्हणून आम्ही एकत्र आलो,असे संजय राऊत यांनी म्हटले.तसेच हे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण हे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर शरद पवारांनी दिलेल्या मिश्किल प्रतिक्रियेवर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “भगवा फडकवला ना. आमचे ५६ आमदार आहेत. आम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिलेला आहे. मी म्हणतो हे स्वबळच आहे. स्वबळ होते म्हणूनच आम्ही एकत्र आलो”, अशी भूमिका त्यांनी मांडली. सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार पडणार असे वारंवार विरोधकांकडून बोलले जात आहेत. यावरही बोलताना, हे सरकार होणारच होते. हे सरकार होणार नाही असे काही लोकांना वाटत होते, पण माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असे वाटत होते त्यानुसार झाले. हे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चालले आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. मधला काही काळ संकटाचा होता. उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरी कोणती व्यवस्था असती तर वेगळे काही घडले नसते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण लढाई चांगल्या पद्धतीने हातळली गेली आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन पाहिले तर त्याचे महत्त्व पटेल, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी हिंदुत्वाविषयी शिवसेनची भूमिका मांडत भाजपला टोला लगावला आहे. आमचे हिंदुत्व हे राजकीय नाही हे सगळ्यांना माहित आहे. ३० वर्षांपूर्वी हिंदुत्वाचे वारे वाहू लागले होते. तेव्हा इराणमध्ये खोमेनी यांचा उदय झाला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही. माझे हिंदुत्व हे वेगळे आहे. केवळ घंटा वाजवणारे हिंदुत्व नाही. किंवा शेंडी आणि जानवे घातले म्हणजे हिंदुत्व तर तसे नाही. राजकारणासाठी शिवसेनेने आजवर हिंदुत्वाचा कधीच वापर केला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांसंदर्भात राज्यपालांची भेट घेतली होती. यावर बोलताना संजय राऊतांनी भाजपसह राज ठाकरेंना देखील फैलावर घेतले. उद्धव ठाकरे हे लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. मात्र असे असताना काही लोक मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही त्यांना भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यपालांनी राज ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावरूनही त्यांनी टोले हाणले. शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. पंतप्रधान मोदी देखील इतर राज्यांना मार्गदर्शन करतात व सल्ला देतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होते?, असा सवाल त्यांनी केला. यासह राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे. भाजपचे लोकही पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही मानू लागले आहेत. त्यामुळे मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार का?, असा प्रश्न विचारला असता, पंकजा यांना आम्ही ऑफर दिलेली नाही. आमच्याकडे उद्धव ठाकरेच ऑफर देतात दुसरे तिसरे कुणी देत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना चार वर्षे खदखद व्यक्त करत होते. त्यांचे नंतर काय झाले सर्वांनाचा माहित, असे म्हणत संजय राऊत यांनी पंकजा यांच्या प्रवेशावर सूचक विधान केले.