ऊर्मिला मातोंडकरांना उमेदवारी,मग निष्ठावंत शिवसैनिकांचे काय?; भाजप नेत्यांचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडर यांना उमदेवारी दिली जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.या संधीचा फायदा घेत आता भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. उर्मिला मातोंडकर यांना उमदेवारी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिकांचे काय होणार असा, असा सवाल आता भाजप नेत्यांकडून केला जात आहे. नव्या लोकांना पदे दिली जात असल्याने जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याची देखील चर्चा आहे.

यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देत आहे. कुणाला उमेदवारी द्यावी, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे.मात्र जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत,जे पक्षासाठी रस्त्यावर उतरतात त्यांचे काय? अशाने निष्ठावंत शिवसैनिकांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. वरळीसारख्या ठिकाणी सुनील शिंदे, सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडली. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांचा विचार व्हायला हवा होता, असे मतही त्यांनी मांडले.

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेवर टीकास्त्र सोडत शिवसैनिकांना सूचक इशारा दिला. उर्मिला मातोंडकर यांच्या नावामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी? असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले होते. त्याचा फोटो शेअर करत निलेश राणे म्हणतात, “काल मी बोललो होती ते खरं ठरलं. जुने शिवसैनिक जर या क्षणाला जागले नाहीत तर, ते स्वतःचं वाटोळं करून घेतील. नंतर कोणाला दोष देऊन उपयोग नसतो”, असे ट्वीट त्यांनी केले आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठी शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चाचपणी करत असल्याची चर्चा होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली अशीही माहिती समोर आली. दरम्यान, उर्मिला यांचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही. ते मीडियामध्ये चर्चेत आहे. आम्हाला याबाबत कल्पना नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.

Previous articleराज्यातील ठाकरे सरकार स्वबळावरच : संजय राऊत
Next articleशरद पवार महाराष्ट्र चालवतात,उद्धव ठाकरे नाही ते त्यांनी मान्यच केले : पाटील