मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत दादांना हिमालयात जावे लागणार नाही. उलट माझ्या कालच्या वक्तव्यावर दादांच्या पुष्टीचे संकेत मिळाले,असेही हसन मुश्रीफ यांनी म्हटले.
हसन मुश्रीफ यांनी ट्विटरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. “चंद्रकांत दादांना हिमालयात जावे लागणार नाही, माझ्या कालच्या वक्तव्यावर दादांच्या पुष्टीचे संकेत… चंद्रकांत दादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती”, असे ट्विट हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हसन मुश्रीफ यांनी काल कोल्हापूमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांची चर्चा झाली असून त्यांच्यात राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावे बाजूला काढून ठेवण्याचे ठरलेले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता.
हसन मुश्रीफ यांच्या या आरोपाला चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले. हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहेत. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून तो लोकशाहीला घातक आहे, अशी टीका करत चंद्रकांत पाटील यांनी आरोपाचे खंडन केले होते. तसेच चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर ऐवजी कोथरूडमधून निवडणूक लढवली होती. यावरून त्यांना विरोधकांचे अनेकदा टोमणे ऐकावे लागले आहेत. यालाही प्रत्युत्तर देताना मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन. पक्षाने आदेश दिल्याने आपण पुण्यातून निवडणूक लढवली होती, असेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.