मेट्रो कारशेडच्या जागेवरून खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड हलवण्यात आलेल्या कांजूरमार्ग या नियोजित जागेवर केंद्र सरकारने आपला मालकी हक्क सांगितला आहे.यावरून आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. मेट्रो कारशेडसाठी राज्याने प्रस्तावित केलेली कांजूरमार्गची जागा ही मिठागराची असल्याचे पत्र केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर आगपाखड केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या या दाव्यावर संताप व्यक्त केला आहे. कांजूरमार्गमधील मिठागराची जमीन महाराष्ट्राचीच आहे.कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर संबंधित राज्याचा प्रथम अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे काम करत असून हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.तसेच केंद्र सरकार या देशात हळूहळू आणीबाणी आणू पाहत आहे,असे सध्याचे चित्र असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी यावर नाराजी व्यक्त केली.राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसते असून हे दुर्दैवी आहे.महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्रसरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

खरं तर ती जमीन महाराष्ट्राची आहे.ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो.भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत.जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय.या देशात केंद्रसरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे असेही सुळे म्हणाल्या.महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे.मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. हे दुदैवी आहे, सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नाही, त्यामुळे कदाचित ते बिचारे असे वागत असतील असा टोलाही सुळे यांनी लगावला.दरम्यान लग्नाचे हॉल्स खुले करण्याची विनंती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा. दिवाळीनंतर हॉल उघडा पण त्याचे बुकींग घ्यायला आता परवानगी द्या. त्यामुळे बॅण्डवाले, कॅटरर्स यांना दिलासा मिळेल असेही सुळे यांनी सांगितले.

यासह अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी देखील केंद्राच्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे. मेट्रोचे काम थांबवण्यासाठी भाजपकडून कटकारस्थान सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्राने २००२ साली मिठागराच्या अनेक जागा या राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आहेत. याआधी भाजपनेच ही खासगी जमीन असल्याचा दावा केला होता. तर आता केंद्र सरकार यावर आपला मालकी हक्क सांगत आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामात अडथळे आणण्यासाठी भाजपचा हा कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपकडून कटकारस्थान सुरू आहे असा आरोप मलिक यांनी केला आहे.केंद्राच्या इंडस्ट्री मंत्रालय खात्याकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे. या पत्रात मेट्रो कारशेडची जागा राज्यसरकारने एमएमआरडीएला वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे. आणि आता कारशेडला दिलेली चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असे पत्रात म्हटले आहे.याआधी मिठागराच्या बर्‍याचशा जागा राज्यसरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्या आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.भाजपचे लोक सुरुवातीला ही खाजगी जागा आहे सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे असे सांगत आहेत यावरुन भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे असेही मलिक म्हणाले.तसेच केंद्राचा हा दावा तपासून राज्य सरकार याला योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Previous articleचंद्रकांत दादांना हिमालयात जावे लागणार नाही : हसन मुश्रीफ यांचा निशाणा
Next articleगिरिश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपला सुरुंग,खडसेंचा सर्जिकल स्ट्राईक