मुंबई नगरी टीम
मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अलिबाग पोलिसांनी अटक केली.अर्णब यांच्या अटकेवरून राज्यातील भाजप नेते संतापले असून त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी अर्णबची पाठराखण करणारे ट्विट केले असून यावर नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले असून अर्णबची पाठराखण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.परंतु नेहमीप्रमाणेच अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर नेटकाऱ्यांनी टीकेचा भडिमार केला आहे. लाज वाटते का, एका महिलेला विधवा केले, एका आईलाही सोडले नाही,त्या व्यक्तीचा एवढा पुळका.सत्तेत असताना तुमच्या पतीने वाचवले आता तुम्ही पुढे या वाचवायला,असे एका नेटकाऱ्याने अमृता फडणवीस यांना सुनावले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना अर्णबला क्लीन चीट देऊन ही केस बंद केली होती, असा आरोपही अनेकांनी केला आहे. ज्याप्रकारे सुशांत,कंगना,अर्णब यांच्यासाठी आवाज निघतो.तसाच मराठी माणूस अन्वय नाईकच्या न्यायासाठी आवाज निघत नाही, अशी टीकाही अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे.अर्णब गोस्वामीवर अटकेची कारवाई केल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांनी याचा विरोध करत ठाकरे सरकारला बोल लगावले. दरम्यान, याधीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण आणि कंगनाला पाठिंबा देणारे ट्विट केल्याने अमृता फडणवीस या टीकेच्या धनी झाल्या होत्या.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला आणीबाणीची उपमा देत काँग्रेसह ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.पंरतु ज्या अर्णबसाठी देवेंद्र फडणवीस गळा काढत आहेत त्यावरूनच आता सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहे. अर्णबवरील कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांना इतका पुळका का ? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अर्णब गोस्वामी यांना आज अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरोधातील ट्विटचा धडाकाच लावला आहे. “जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना साथ देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कटाचा भांडफोड केल्याची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. टुकडे टुकडे गँग असो वा पालघरमधील खुनीला शरण देणार कोण आहेत ? याचे उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे देश मागत आहे. आणि याच काँग्रेस पक्षाच्या इशाऱ्यावर नाचणारे कमकुवत सरकार,महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने घेऊन जात आहे.माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणारे आता कुठे लपून बसले आहेत? आज सगळे दुतोंडी चेहरे उघडे पडले आहेत”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गोस्वामीला समर्थन देऊन सरकारवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच नेटकऱ्यांनी जाब विचारला आहे. तुमचे सरकार असताना का नाही अर्णबला अटक झाली ?, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना अर्णबला क्लीन चीट देऊन ही केस बंद करून टाकल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे. आली रे आली आता तुझी बारी आली, केस दाबणे अंगाशी येणार.एका गुन्हेगाराला अटक झाली असून भाजप गळा काढून का राडतंय? भाजप नक्की काय लपवू पाहत आहे? असे अनेक प्रश्न लोकांनी फडणवीस यांना विचारले. तर या प्रकरणी अर्णबला अटक झाल्याने अनेकांनी ठाकरे सरकारचे आभार मानत न्याय मिळेल अशी अपेक्षा केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील अर्णबची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला असून नेटकाऱ्यांनी त्यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे.