अर्णब गोस्वामी अटक : शिवसेना भाजपमध्ये ‘पोपटावरून’ रंगला कलगीतुरा

मुंबई नगरी टीम

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीच्या अटकेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकले, अशी खोचक टीका शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याच अंदाजात प्रत्युत्तर दिले आले.अर्णब आमचा पोपट नाही.शिवसेनाच पोपट पाळते,असा प्रत्यारोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर राज्यापासून ते केंद्रातील भाजप नेत्यांनी याचा निषेध करत ठाकरे सरकारवर टीका केली.याला उत्तर देताना अनिल परब यांनी अर्णबच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काहीही संबध नसल्याचे म्हटले.अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या टिकेल उत्तर दिले.आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात अर्णब गोस्वामीवर कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते असे काही ओरडत आहेत, जसे की तो भाजपचा कार्यकर्ता आहे. ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नसून सरकारचा या प्रकरणाशी संबंध नाही, अशी भूमिका अनिल परब यांनी स्पष्ट केली. तसेच एका मराठी महिलेचे कुंकू पुसले गेले त्याला वाचवण्याचा प्रयन्त भाजप करत आहे. भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकले आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का ? अर्णबच्या तोंडून काही नावे बाहेर पडतील का ? असा सवाल उपस्थित करत भाजपचा पोपट पिंज-यात असे टीकास्त्र अनिल परब यांनी भाजपवर सोडले.

अर्णब आमचा पोपट नाही,आम्ही पोपट वैगरे पाळत नाही. पोपट तेच पाळतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. अर्णब यांनी विरोधात बोलल्यामुळे राज्य सरकार कुठलीतरी संधी शोधत आहे. त्यातूनच ही कारवाई झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. अर्णबच्या अटकेचा निषेध करत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नागपुरात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. आणीबाणी असल्यासारखे काहीही केले तरी चालते या भ्रमात सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी राहू नये, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Previous articleअर्णबची पाठराखण केल्याने देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार
Next articleपुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून उमेदवारी ?