म्हणून मुख्यमंत्री यशोमती ठाकूरांचा राजीनामा घेत नाहीत;चंद्रकांत पाटलांनी सांगितले हे कारण

मुंबई नगरी टीम

अमरावती : पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावतीच्या तिवसा येथे आंदोलन केले. यावेळी त्यांनी यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा,अशी मागणी केली.परंतु यशोमती ठाकूर यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकार आपला पाठिंबा काढून घेईल,अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटत असल्याने ते राजीनामा घेत नाहीत,अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. यशोमती ठाकूर जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही. आंदोलन करतच राहणार, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आठ वर्ष जुन्या पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणात यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. त्यामुळे या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भाजपला हे मंजूर नसून त्यांनी यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Previous articleठाकरे सरकारची हुकुमशाही प्रवृत्ती खपवून घेणार नाही : प्रविण दरेकरांचा इशारा
Next articleअर्णब प्रकरणी दिल्लीतील पडद्यामागील सत्य बाहेर काढलं तर सर्वांना पळता भुई थोडी होईल