ठाकरे सरकारची हुकुमशाही प्रवृत्ती खपवून घेणार नाही : प्रविण दरेकरांचा इशारा

मुंबई नगरी टीम

अलिबाग : रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ विधानपरिषदेचे विरोधी नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज अलिबाग न्यायालयलाबाहेर जोरदार आंदोलन केले. कायदा सर्वांना समान आहे व तो आम्हालाही मान्य आहे. परंतु अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक म्हणजे सरकारने सूडभावनेने केलेली कारवाई आहे. लोकशाहीच्या चौथा स्तंभाच्या पाठीशी भाजप ठामपणे उभे आहोत.परंतु महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची हुकुमशाही या प्रकारची प्रवृत्ती आम्ही खपवून घेणार नाही असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

भाजपाने हा निषेध मोर्चा भाजपा पक्ष कार्यालय ते अलिबाग न्यायालय असा काढला केला होता. भारत माता की जय…,वंदे मातरम, आणीबाणी लावणा-या सरकारचा धिक्कार असो.. महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो…मुर्दाबाद मुर्दाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद…अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी भाषण केले.यावेळी माजी खासदार किरिट सोमय्या, आमदार रविशेठ पाटील, आमदार राहुल नार्वेकर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, कृष्णा कोबनाक, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, आज आणीबाणी सदृश्य परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे कारण काँग्रेसने १९७५ मध्ये लावलेल्या आणीबाणीला शिवसेनेने समर्थन केले होते आणि पुन्हा अश्या प्रकारचे वातावरण या राज्यात निर्माण होतेय, जी केस बंद केली आहे ती पुन्हा उकरून काढायची आणि केवळ दिखावा करण्याचा प्रयत्न केला जोतोय. नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी आम्ही गोस्वामी यांना अटक करत आहे, पण यामागील मूळ उद्देश हा मीडियाची मुस्कटदाबी करणे हाच आहे असा आरोपही त्यांनी केला. सूडाचा अंत हा वाईटच असतो. मग तो कुठलाही पक्ष असो वा कुठलेही सरकार, कोणालही सूडाने फार काळ वागता येत नाही. जेव्हा देशात आणीबाणी झाली त्यावेळी जनतेने काय उठाव केलाय हे देशाने पाहिले आहे. मोठे सत्ताधीश व दिग्गज उध्वस्त करण्याची ताकद या जनतेत आहे. जेव्हा अत्याचार होतात तेव्हा जनतेमध्ये यांना उध्वस्त करण्याची ताकद असते आणि तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास जनतेचा उद्रेकच या सरकारला यांची जागा दाखवून देईल अशी टिकाही दरेकर यांनी केली.

राज्यात आणीबाणी सारखे वातावरण होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी आहे असे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, याप्रकरणात महिलेचे कुंकू पुसण्याची गोष्ट काही जण करत आहेत पण महाराष्ट्रात तुमच्या सरकारच्या काळात अनेक महिलांचे कुंकू पुसले गेल्याच्या घटना आहेत, मग या निमित्ताने त्याही केसेस बाहेर काढाव्यात. परंतु केवळ अर्णब गोस्वामी यांना याप्रकरणात अडकवायचे हाच उद्देश्य असेल तर ते अत्यंत वाईट आहे. केवळ नाईक कुटुंबिय नाही तर महाराष्ट्रातील ज्या-ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत, त्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. परंतु केवळ अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करण्यासाठी या केसचा आधार घेतला जातोय व या माध्यमातून ठाकरे सरकार खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

Previous articleउद्यापासून राज्यातील थिएटर्स,नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार
Next articleम्हणून मुख्यमंत्री यशोमती ठाकूरांचा राजीनामा घेत नाहीत;चंद्रकांत पाटलांनी सांगितले हे कारण